मुक्ताईनगर, दि. ४ : केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपा नेत्या रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये अश्लील, आक्षेपार्ह व मानहानीकारक वक्तव्य करण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यानंतर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले की, नंदुरबार येथील विजय चौधरी या व्यक्तीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी अत्यंत अश्लील, अवमानकारक व बदनामीकारक भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य केवळ एका लोकप्रतिनिधीचा अपमान नसून सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सन्मानावर घाला घालणारे असून समाजात चुकीचा संदेश देणारे असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. रक्षाताई खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील लाखो नागरिकांच्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याविषयी करण्यात आलेल्या अशोभनीय वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा विकृत व समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याची मागणीही करण्यात आली. संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र सवळे, अतुल महाजन, पंकज कोळी, भाजपा जिल्हा सदस्य चंद्रकांत भोलाणे, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख ललिता महाजन, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. प्रविण पाचपांडे, सचिन पाटील, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेविका माधुरी सचिन पाटील, नगरसेविका साधना बापू ससाणे, नगरसेवक नईम बागवान, वैशाली मनोज जाधव, शितल लक्ष्मण सापधरे, इंद्रायणी प्रकाश भोई, अनुराधा योगेश चौधरी, सालबर्डीच्या माजी सरपंच तृप्ती तुषार राणे, स्वाती पंकज भारंबे, कोथळीचे सरपंच नारायण चौधरी, प्रशांत महाजन, बापू ससाणे, लक्ष्मण सापधरे, बाळा चिंचोले, कैलास वंजारी, दत्ता जोगी, माजी सरचिटणीस अंकुश चौधरी, पंकज पाटील, पंकज सरोदे, मयूर महाजन, जुबेर अली, अनिस पटेल, विनायक पाटील, प्रशांत जंगले, उमेश राणे, योगेश चौधरी, ललित खडसे, जानकीराम पांडे, सुनिल श्रीखंडे, सोमनाथ पाटील, योगेश मनसुटे, सार्थक पाटील, जयेश कारले, लखीचंद जैन यांच्यासह भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाडी व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


