भुसावळ(प्रतिनिधी )- दि. ४ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी–भुसावळ रेल्वे मार्गावर भादली ते जळगाव दरम्यान सुरू असलेल्या पाचव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांतर्गत भादली स्थानकाच्या यार्डाची पुनर्रचना आणि पाचव्या मार्गासाठी आवश्यक जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी नॉन-इंटरलॉकिंग ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काही गाड्यांचे नियमन व पुनर्निर्धारण करण्यात आले आहे. या कामामुळे रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास, गाड्यांची वक्तशीरता सुधारण्यास तसेच भविष्यात सुरक्षित व सुरळीत रेल्वे संचालनास मोठी मदत होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. १४ गाड्या रद्द नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे ११ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध मार्गांवरील १४ गाड्या त्यांच्या प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आल्या आहेत. १२ ऑगस्ट रोजी नंदुरबार–भुसावळ पॅसेंजर (गाडी क्र. ५९०७५), भुसावळ–नंदुरबार पॅसेंजर (५९०७६), नाशिक रोड–बडनेरा विशेष (०१२१२), बडनेरा–नाशिक रोड विशेष (०१२११), इगतपुरी–भुसावळ मेमू (११११९), भुसावळ–इगतपुरी मेमू (१११२०), देवळाली–भुसावळ मेमू (११११३), भुसावळ–देवळाली मेमू (११११४), दादर–भुसावळ विशेष (१९००३), भुसावळ–दादर विशेष (१९००४) तसेच भुसावळ–कटनी एक्स्प्रेस (१९०१३) रद्द राहतील. तसेच, ११ ऑगस्ट रोजी सुरत–भुसावळ एक्स्प्रेस (१९००५), १४ ऑगस्ट रोजी भुसावळ–सुरत एक्स्प्रेस (१९००६) आणि कटनी–भुसावळ एक्स्प्रेस (१९०१४) रद्द करण्यात आल्या आहेत. दोन एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलले हिसार–हैदराबाद एक्स्प्रेस (गाडी क्र. १७०१९) आणि अमृतसर–नांदेड एक्स्प्रेस (गाडी क्र. १२७१६) या गाड्या ११ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या प्रस्थान स्थानकावरून सुटल्यानंतर भुसावळ सी केबिन (कॉर्ड लाइन)–अकोला–पूर्णा या पर्यायी मार्गाने चालविण्यात येतील. ११ गाड्यांचे नियमन १२ ऑगस्ट रोजी विविध मार्गांवरील ११ गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. यामध्ये बेंगळुरू–नवी दिल्ली एक्स्प्रेसला मनमाड–जळगाव दरम्यान १ तास ३५ मिनिटे, लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर एक्स्प्रेसला १ तास ४० मिनिटे, यशवंतपूर–हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला १ तास ३० मिनिटे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–आसनसोल एक्स्प्रेसला १ तास २५ मिनिटे नियमन करण्यात येईल. लोकमान्य टिळक टर्मिनस–जयनगर एक्स्प्रेसला १ तास ५ मिनिटे, अमृतसर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेसला खंडवा–भुसावळ दरम्यान १ तास ५५ मिनिटे, गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला १ तास ४० मिनिटे आणि जयनगर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला १ तास ३० मिनिटे नियमन करण्यात येणार आहे. तसेच, गोंदिया–कोल्हापूर एक्स्प्रेसला अकोला–भुसावळ दरम्यान १ तास १५ मिनिटे, बनारस–हडपसर अमृत भारत एक्स्प्रेसला खंडवा–भुसावळ दरम्यान तब्बल ३ तास आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल–भगत की कोठी एक्स्प्रेसला अकोला–जळगाव दरम्यान २ तास नियमन करण्यात येईल. हडपसर–बनारस एक्स्प्रेसची वेळ बदलली हडपसर–बनारस एक्स्प्रेस (गाडी क्र. २२५९०) ही गाडी १२ ऑगस्ट २०२६ रोजी हडपसर येथून नियोजित वेळेपेक्षा उशिरा, सकाळी १०.२० वाजता सुटेल. या गाडीची नियोजित सुटण्याची वेळ सकाळी ७.५० वाजता होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासास निघण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती NTES, RailOne ॲप किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासण्याचे आवाहन केले आहे. या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेने दिलगीरी व्यक्त केली असून, भविष्यात अधिक सुरक्षित, सक्षम आणि सुरळीत रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे नॉन-इंटरलॉकिंग काम अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे.


