लोणावळा स्थानकावर सतर्कता आणि धाडसाचे दर्शन; पॉइंट्समन व आरपीएफ जवानांनी वाचवला दिव्यांग प्रवाशाचा जीव

लोणावळा : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा रेल्वे स्थानकावर पॉइंट्समन आणि आरपीएफ जवान यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका दिव्यांग प्रवाशाचा जीव वाचला. धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करताना तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाला वेळीच गाडीपासून दूर ओढत दोन्ही कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसी कृती केली.

ही घटना २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.२५ वाजता घडली. गाडी क्रमांक ११०३० कोल्हापूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेस लोणावळा स्थानकावर आली होती. सायंकाळी ६.३२ वाजता गाडी सुटत असताना एका दिव्यांग प्रवाशाने कुबड्यांच्या सहाय्याने द्वितीय श्रेणीच्या सामान्य डब्यात चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी सुरू असतानाच त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.

ही घटना लक्षात येताच कर्तव्यावर असलेले पॉइंट्समन श्री. व्हॅलेंटाईन डिसूझा आणि आरपीएफ जवान श्री. सिकंदर साहनी यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. दोघांनीही प्रसंगावधान राखत संबंधित प्रवाशाला धावत्या गाडीपासून सुरक्षित अंतरावर ओढून घेतले आणि संभाव्य भीषण अपघात टाळला.

कर्जत येथील रहिवासी असलेल्या अमित या प्रवाशाला घटनेनंतर धक्का बसला होता. त्याला तातडीने प्रथमोपचार देण्यात आले तसेच धीर देण्यात आला. लोणावळा येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याच्या पुढील प्रवासाचीही व्यवस्था करत त्याला पुढील गाडीत सुरक्षित व आरामात बसवले.

श्री. व्हॅलेंटाईन डिसूझा आणि श्री. सिकंदर साहनी यांनी दाखवलेली सतर्कता, धाडस आणि प्रसंगावधान हे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. लाखो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी रेल्वेचे कर्मचारी व सुरक्षा दलाचे जवान चोवीस तास कार्यरत असतात, असेही प्रशासनाने नमूद केले.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. अशा प्रकारची कृती जीवघेणी ठरू शकते तसेच गंभीर किंवा कायमस्वरूपी दुखापत होण्याची शक्यता असते.