ठाणे स्थानकावरील अस्वच्छतेच्या तक्रारीची मध्य रेल्वेकडून तत्पर दखल; ‘मल्टी-पर्पज स्टॉल’ ७ दिवसांसाठी सील, कंत्राटदाराला १५ हजारांचा दंड

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षा कक्षात असलेल्या ‘मल्टी-पर्पज स्टॉल’मधील अस्वच्छतेबाबत सोशल मीडियावर प्राप्त झालेल्या तक्रारीची मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई केली आहे. स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित स्टॉल ७ दिवसांसाठी सील करण्यात आला असून, स्टॉल चालविणाऱ्या कंत्राटदाराला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मध्य रेल्वे सर्व स्थानकांवर प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ठाणे स्थानकातील प्रतीक्षा कक्षात कार्यरत असलेल्या ‘मल्टी-पर्पज स्टॉल’च्या अस्वच्छतेबाबत सोशल मीडियावर तक्रार प्राप्त होताच रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली.

तक्रारीची खातरजमा केल्यानंतर संबंधित स्टॉलमध्ये स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यानंतर कंत्राटदाराविरोधात त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्टॉल ७ दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, कंत्राटदाराला १५ हजार रुपयांचा आर्थिक दंडही करण्यात आला आहे.

खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि इतर व्यावसायिक युनिट्समध्ये अस्वच्छता आढळल्यास कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. अन्नसुरक्षा मानके आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी विविध रेल्वे स्थानकांवर नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

दरम्यान, प्रवाशांनी स्वच्छता, खाद्यपदार्थ सेवा किंवा प्रवासी सुविधांशी संबंधित कोणतीही समस्या आढळल्यास ‘रेल-मदद’च्या माध्यमातून आपला अभिप्राय नोंदवावा अथवा तक्रार करावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सर्व प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वे सातत्याने प्रयत्नशील असून, प्रवाशांच्या तक्रारींवर तातडीने आणि प्रभावीपणे कारवाई केली जाईल, असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे.