भुसावळात आरपीएफची मोठी कारवाई; ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत उधना–अमृत भारत एक्स्प्रेसमधून ७.९७८ किलो गांजा जप्त, तस्कराला अटक

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे मार्गाचा वापर करून होणाऱ्या अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत उधना–अमृत भारत एक्स्प्रेसमधून तब्बल ७.९७८ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी एका संशयित तस्कराला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त अमली पदार्थांची अंदाजे बाजार किंमत ३ लाख ९८ हजार ९०० रुपये इतकी असल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली.

ही कारवाई ३० जुलै २०२६ रोजी गाडी क्रमांक १९०२२ अप उधना–अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली. गाडीच्या अनारक्षित डब्यात सीआयबी/भुसावळचे उपनिरीक्षक सुनील कोळी हे नियमित गस्त व सखोल तपासणी करीत असताना एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशी व तपासात संबंधित प्रवासी रेल्वेच्या शौचालयात अमली पदार्थ लपवून त्याची वाहतूक करीत असल्याचे उघड झाले.

या प्रकरणात बाबू विजय गौडा (वय २३), रा. धमनखौला, डिगापडा कोडला, जि. गंजाम, ओडिशा याला ताब्यात घेण्यात आले. गाडी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर येताच सहाय्यक उपनिरीक्षक ओ. पी. मीणा आणि आरपीएफच्या पथकाने तत्परतेने कारवाई करून संशयिताला त्याच्या बॅगसह ताब्यात घेतले. पुढील तपासणीसाठी त्याला सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले.

घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर आरपीएफच्या श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकातील ‘वीरू’ या श्वानाने संशयिताच्या बॅगेची तपासणी करत अमली पदार्थ असल्याचे संकेत दिले.

आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर राजपत्रित अधिकारी अभय कुमार शर्मा, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (गुड्स), भुसावळ यांच्या उपस्थितीत विधिवत जप्ती पंचनामा करण्यात आला. बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये गांजाचे चार पॅकेट आढळून आले.

जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन ७.९७८ किलोग्रॅम असून, त्याची अंदाजे बाजार किंमत ३,९८,९०० रुपये इतकी आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीसह जप्त अमली पदार्थ शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी), भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आरपीएफ ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत रेल्वे मार्गाचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या समाजविघातक घटकांविरोधात सातत्याने दक्षता ठेवून प्रभावी कारवाई करीत आहे. प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच गुन्हेमुक्त आणि सुरक्षित रेल्वे वातावरण निर्माण करणे, यासाठी आरपीएफ कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.