भुसावळ (प्रतिनिधी) – द लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, भुसावळच्या सन २०२६-२७ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. भूपेश विश्राम बाविस्कर यांनी प्रतिस्पर्धी ॲड. श्याम श्रीगोंदेकर यांचा पराभव करत प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला. अध्यक्षपदासाठी २१ जुलै २०२६ रोजी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील बार रूम क्रमांक ३ येथे मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी ५ वाजेनंतर मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. सुशील चंद्रकुमार मेढे यांनी निकाल जाहीर केला. कार्यकारिणीतील इतर पदांसाठी बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये उपाध्यक्षपदी ॲड. रम्मू पटेल, सचिवपदी ॲड. अभिजीत मेने, सहसचिवपदी ॲड. सुनील सोनार, महिला सहसचिवपदी ॲड. विना एसने (शेंद्रे), कोषाध्यक्षपदी ॲड. प्रीतम मेढे, सहकोषाध्यक्षपदी ॲड. मुकेश चौधरी, तर ग्रंथपालपदी ॲड. जयश्री उदले (जैन) यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. प्रकाश पाटील, ॲड. चंद्रशेखर चतुर व ॲड. दर्शन लोखंडे यांची निवड झाली. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. विजय मिळाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. भूपेश विश्राम बाविस्कर यांनी सर्व मतदार वकील बांधवांचे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. सुशील चंद्रकुमार मेढे यांचे आभार मानले. वकील संघातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संघाच्या सर्वांगीण विकासासाठी, न्यायालयीन सुविधा वाढविण्यासाठी तसेच वकिलांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही ॲड. बाविस्कर यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ वकील, ज्युनिअर वकील, सहकारी वकील, हितचिंतक व समर्थकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. नवीन कार्यकारिणीमुळे भुसावळ वकील संघाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


