नीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वरणगावात महाविकास आघाडीचे आंदोलन

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी; पोलिसांना निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी) : नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा निषेध, दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या विरोधात तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वरणगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले.

वरणगाव पोलीस ठाण्यासमोर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन शासन व संबंधित प्रशासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली.

महाविकास आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, NEET परीक्षा पेपरफुटीच्या कथित प्रकरणामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्यावर पोलिसांनी कथितपणे लाठीहल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला.

परीक्षा व्यवस्थेतील कथित अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच राज्यातील शिक्षण व परीक्षांमधील कथित गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

याशिवाय, जंतर-मंतर येथील कथित लाठीहल्ल्यास जबाबदार असलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, NEET पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या.

या आंदोलनात प्रतिभा तावडे, रमेश पाटील, दीपक मराठे, मनोज देशमुख, डॉ. राहुल भोईटे, डॉ. अहेसान, कुलदीप देशमुख, राहुल जोहरे, पंकज पाटील, अशपाक काझी, नरेंद्र इंगळे, शाहरुख खान, पी. एस. भैसे, राहुल सोनवणे, जितेंद्र तावडे, नाना चौधरी, सुनील भोई, संजय कोळी, सुनील अहिरराव, मनोज अग्रवाल, शेख हनीप, शेख समीर, निर्मला जवरे, अनिता निकम, विश्रांती पवार, एस. डी. कापसे, पूजा भिलावे, अनिता लोखंडे, अजहर अली, चंद्रकांत शर्मा, तेजस चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.