जमिनीच्या वादातून पुतण्याने केली काकाची निर्घुण हत्या ; रावेर तालुक्यात खळबळजनक घटना : मृतदेह टाकला नाल्यात ; अपघाताचा बनाव; अवघ्या काही तासांत आरोपी अटक:

रावेर – जमिनीच्या जुन्या वादातून सख्या पुतण्याने काकाच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील गारखेडा येथे घडली आहे. हत्या केल्यानंतर गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने मृतदेह 20 ते 25 मीटर फरफटत नेऊन नाल्याच्या काठावर टाकत अपघात झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पोलीस ठाण्यांतर्गत पाल दूरक्षेत्राच्या हद्दीतील गारखेडा येथील रहिवासी रामा थावरू बारेला (वय 46) यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. गारबर्डीच्या पोलीस पाटलांनी दि. 21 जुलैच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती रावेर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्रथमदर्शनी मृतदेहाच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर जखम दिसून आल्याने पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता, मयत रामा बारेला यांचा त्यांचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय 29) याच्याशी गेल्या 5-6 दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. आरोपी अनिल हा काकाला रोज शिवीगाळ करत होता. दि. 21 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास रागाच्या भरात अनिलने घराजवळ काका रामा बारेला यांच्या डोक्यात लाकडी काठीने जोरदार प्रहार केला. या गंभीर मारहाणीत रामा बारेला यांचा जागीच मृत्यू झाला. काकाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच, आरोपी अनिलने कारवाईपासून वाचण्यासाठी कट रचला. त्याने मृतदेह घटनास्थळापासून 20 ते 25 मीटर अंतरावर ओढत नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या किनाऱ्यावर फेकून दिला, जेणेकरून रामा यांचा मृत्यू अपघाताने झाला असावा असा बनाव निर्माण होईल.
संशयावरून पोलिसांनी पुतण्या अनिल बारेला याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवत चौकशी केली असता, त्याने जमिनीच्या वादातून काकाची काठीने मारून हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अनिल जखा बारेला याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.