भुसावळ प्रतिनिधी : संविधान नगर परिसरातील लोणारी हॉलजवळ एका घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा लोखंडी सब्बलच्या साहाय्याने तोडून घरातील टीव्ही, गॅस सिलिंडर, शेगडी व स्टीलची भांडी असा एकूण ८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २१ जुलै रोजी रात्री घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयूर संदिप लोखंडे (वय १८, व्यवसाय मजुरी, रा. लोणारी हॉलजवळ, संविधान नगर, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बाबू सिकंदर शेख (रा. कवाडे नगर, भुसावळ) आणि संदिप रेवाराम कहार (रा. नॉर्थ कॉलनी, भुसावळ) यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी रात्री सुमारे १ वाजता आरोपींनी फिर्यादीच्या संमतीशिवाय लोखंडी सब्बलच्या साहाय्याने घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर घरातील ३ हजार रुपये किमतीचा १८ इंची एलजी कंपनीचा टीव्ही, २ हजार ५०० रुपयांचे भारत गॅस सिलिंडर, १ हजार रुपयांची गॅस शेगडी आणि १ हजार ५०० रुपयांची स्टीलची संसारोपयोगी भांडी, असा एकूण ८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक रज्जाक खान करीत आहेत.


