भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यातील विविध भागांत अवैधरित्या गावठी कट्टे पुरवण्यासाठी कुख्यात असलेल्या मध्यप्रदेशातील उमर्टी परिसरात जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी पहाटे संयुक्तपणे मोठी कारवाई केली. ‘ऑपरेशन उमर्टी’ अंतर्गत ४०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पहाटे २ ते सकाळी ८ वाजेपर्यंत व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबवले. तीन जिल्ह्यांतील पोलिसांचा मोठा ताफा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उमर्टी परिसरात दाखल होताच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी धावपळ उडाली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन देशी कट्टे, चार जिवंत काडतुसे, गावठी कट्टे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, साचे तसेच अन्य साहित्य जप्त केले. कारवाईत महाराष्ट्र पासिंगच्या तब्बल ३२ संशयित मोटारसायकली आढळून आल्याने त्या ताब्यात घेऊन जप्त करण्यात आल्या. तसेच ४५ घरांची झडती घेण्यात आली. २० संशयितांची सखोल चौकशी करण्यात आली असून, १२ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय २७ फरार व संशयित आरोपींच्या घरांचे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिओ-टॅगिंग करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर व चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे तसेच नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर शस्त्र अधिनियमातील गुन्ह्यांतील फरार व सराईत आरोपींच्या शोधासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बावळे (मालेगाव), जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, अमळनेर उपअधीक्षक विनायक कोते, भुसावळ उपअधीक्षक केदार बारबोले, चोपडा विभागाचे सुनील पाटील, शिरपूर उपविभागाचे सुधीर पाटील आदी अधिकारी सहभागी झाले. याशिवाय धुळे गुन्हे शाखेचे ज्ञानेश्वर वारे, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, मालेगावच्या पवारवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ, चोपडा शहरचे निरीक्षक पवन देसले, चोपडा ग्रामीणचे निरीक्षक संजय सोनवणे, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे, जिविशाच्या कावेरी कमलाकर, धुळे नियंत्रण कक्षाचे राजू सुर्वे यांच्यासह जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलिस दलातील ४०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. उमर्टी परिसरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे अवैध शस्त्रनिर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.



