भुसावळ (प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाचे आयोजन बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संतोषीमाता हॉल, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ येथे करण्यात आले आहे. ‘गतीमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ योजनेअंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या विविध शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी, समस्या तसेच योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. संजय सावकारे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या शिबिरास संबंधित अधिकारी, कर्मचारी, गरजू लाभार्थी तसेच नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, भुसावळ भाग, भुसावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


