भुसावळात संतोष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो कडुनिंबाच्या रोपांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश.

   भुसावळ (प्रतिनिधी)-: भुसावळ शहरात पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या नगरसेवकांनी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध भागांत शेकडो कडुनिंबाच्या रोपांचे वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श घालून दिला.

या उपक्रमाचा उद्देश केवळ वाढदिवस साजरा करणे नसून, भावी पिढ्यांसाठी हरित आणि स्वच्छ पर्यावरणाचा संदेश देणे हा होता. शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागांमध्ये कडुनिंबाच्या रोपांची लागवड करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, जगन सोनवणे, ,पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, तसेच कार्यकर्ते  मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच प्रसंगी सर्वांनी मिळून वृक्षारोपण करत या रोपांची नियमित देखभाल करण्याचा संकल्प केला. रोपे सुरक्षित वाढावीत यासाठी प्रत्येक रोपाभोवती संरक्षणात्मक जाळीही बसविण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचेसह उपस्थीत मान्यवरांनी वाढते प्रदूषण आणि घटती हरितसंपदा ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. वाढदिवसासारखे विशेष दिवस समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे साजरे करणे हाच खरा उत्सव असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाचे शहरवासीयांनीही स्वागत करत पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले हे सकारात्मक पाऊल असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही अशा जनहिताच्या आणि पर्यावरणपूरक मोहिम सातत्याने राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

भुसावळ शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, प्रत्येक वाढदिवशी एक झाड लावण्याची सवय रुजल्यास भविष्यात शहर अधिक समृद्ध आणि हरित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.