भुसावळ (प्रतिनिधी)- राज्यात सन २०२६ च्या खरीप हंगामात आतापर्यंत ३१० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना माणसांसोबतच मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर गौमाता, श्वान, पक्षी तसेच इतर मुक्या जीवांची तहान भागविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन गौरक्षक व गौसेवक वैभव वाघे यांनी केले आहे. माणसाला तहान लागल्यास तो पाणी मागू शकतो, पाण्याची बाटली विकत घेऊ शकतो किंवा स्वतःसाठी पाण्याची व्यवस्था करू शकतो. मात्र, मुक्या प्राण्यांना आपली तहान शब्दांत व्यक्त करता येत नाही. उन्हामुळे आणि पाणीटंचाईमुळे त्यांची होणारी तगमग अनेकदा आपल्या नजरेस पडत नाही. त्यामुळे या जीवांसाठी पाण्याची व्यवस्था करणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे वैभव वाघे यांनी म्हटले आहे. मुक्या जीवांसाठी प्रत्येकाने घ्यावा पुढाकार आपल्या परिसरातील गोठे आणि गोशाळांमध्ये गौमातेसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. घराबाहेर, इमारतींच्या परिसरात तसेच रस्त्याच्या सुरक्षित ठिकाणी श्वानांसाठी पाण्याची भांडी ठेवावीत. घराच्या गच्चीवर, बाल्कनीत, अंगणात किंवा झाडांवर पक्ष्यांसाठी पाण्याची छोटी भांडी ठेवावीत. तसेच मांजरे, खारी आणि इतर प्राण्यांनाही सहज पाणी उपलब्ध होईल, अशा सुरक्षित ठिकाणी पाण्याची सोय करावी. हा उपक्रम केवळ वैयक्तिक पातळीवर न राबवता मित्रपरिवार, सामाजिक संस्था, मंडळे, सोसायट्या आणि गावातील तरुणांनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी पाण्याची भांडी ठेवावीत. विशेष म्हणजे ही भांडी नियमित स्वच्छ करून त्यात दररोज ताजे पाणी भरावे, असेही त्यांनी सुचविले आहे. पाण्याची बचत करणेही तितकेच महत्त्वाचे दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी नळ उघडे ठेवू नयेत, पाणी विनाकारण वाहू देऊ नये आणि आवश्यकतेनुसारच पाण्याचा वापर करावा. पाण्याची बचत आणि मुक्या जीवांसाठी पाण्याची व्यवस्था या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे. छोट्या कृतीतून मोठे जीवदान! याबाबत वैभव वाघे म्हणाले की, "दररोज आपण मंदिरात जाऊन देवाचा शोध घेतो; मात्र खरे देव या मुक्या जीवांमध्येही वास करतात. त्यांची सेवा करणे आणि त्यांची तहान भागवणे हीसुद्धा ईश्वरसेवाच आहे. आपण प्रत्येकाने आपल्या घराबाहेर पाण्याचे एक भांडे ठेवले, तरी अनेक पक्षी आणि प्राण्यांची तहान भागू शकते. यासाठी मोठ्या पैशांची गरज नाही, तर गरज आहे ती माणुसकीची आणि सेवाभावाची." पुढे ते म्हणाले की, मुक्या जीवांना बोलता येत नसले तरी त्यांनाही तहान लागते, वेदना होतात आणि जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या या कठीण काळात माणसांसोबतच मुक्या प्राण्यांचाही विचार करून प्रत्येकाने आपल्या परीने पाण्याची व्यवस्था करावी. "मंदिरात देवाला पाणी अर्पण करण्यासोबतच रस्त्यावर तहानलेल्या मुक्या जीवाला पाणी पाजण्याचा संकल्प करूया. हीच खरी माणुसकी, हीच खरी गौसेवा आणि हीच खरी ईश्वरसेवा!" असे भावनिक आवाहन गौरक्षक व गौसेवक वैभव वाघे यांनी नागरिकांना केले आहे.



