शिंदी, ता. भुसावळ (वार्ताहर) - येथून जवळ असलेल्या चोरवड जवळील पुलाच्या दोन्ही आजूबाजूने रस्त्याचे काम अपूर्ण असून त्या ठिकाणच्या खडी व धुळीमुळे वाहन धारक व प्रवासी कमालीचे हैराण झाले असून त्या ठिकाणी तात्काळ दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, या चोरवड जवळील पुलाच्या आजूबाजूने जामनेर - भुसावळ या दोन्ही बाजूकडील रस्त्याची कामे जवळपास पूर्णतः झाली आहेत मात्र पुलाच्या दोन्ही बाजूस काही अंतरापर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण आहे. या ठिकाणी खोलगट असा उतरणचा भाग झालेला असल्याने रस्त्यांना खडी मातीचा लावलेला भराव वाहनांमुळे निघून जात असतो व वाहने जोरदार आदळत असतात. छोट्या वाहनधारकांना या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. एका वाहनाच्या टायरा खालून खडी उडून दुसऱ्या वाहनांना- वाहनधारकांना लागण्याचे प्रकार वारंवार होत असल्याचे दिसून येते. अधून मधून पाणी मारले जाते. मात्र काही वेळातच ते कोरडे होऊन वाहनांच्या वापरामुळे पुन्हा येरे माझ्या मागल्या! असा प्रकार होत असतो. दिवसा सतर्कता बाळगणे सहज सोपे होते मात्र रात्रीचे वेळेस मोठ्या वाहनांच्या उडणाऱ्या धुळीमुळे छोटे वाहनधारक अडचणीत येत असतात. रस्त्यावरील धूळ, खड्डे व खडी यामुळे वाहनधारकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात . आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
फुलाचे कोणतेही काम होण्याची हालचाल दिसून येत नसल्याने काम करण्यास जर उशीर असेल तर दोन्ही बाजूच्या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास वाहनधारकांचा त्रास कमी होईल.
खडी वर आलेली असल्याने दुचाकी तसेच इतर मोठे वाहने चालवताना या ठिकाणी कसरत होत असते. धुळीमुळे माणसांच्या तब्येतीवर तर खडीमुळे छोट्या मोठ्या वाहनांवर दुरुस्तीचे संकट उभे राहत असल्याचे दिसते. संबंधित जबाबदार अधिकारी व ठेकेदार यांनी या ठिकाणी व्यवस्थित रस्ता करण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे
रस्त्यावरील धुळीमुळे श्वासनाचे विकार, डोळ्यांचे आजार, ऍलर्जी आणि त्वचेचे विकार तसेच खडीमुळे पाठ आणि मणक्याचे आजार, सांधे आणि स्नायूंचे दुखणे व अपघात झाल्यास गंभीर दुखापत मानसिक ताण आणि थकवा या प्रसंगांना तोंड द्यावे लागते या बाबी लक्षात घेता या ठिकाणी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.....
-- सौ निलिमा गिरीश नेमाडे. (सामाजिक कार्यकर्त्या), शिंदी ता. भुसावळ.