अप्पर तहसील कार्यालयांच्या मंजुरीत वरणगावला डावलले; नगराध्यक्ष सुनील काळे यांचा सवाल ; २८ गावांचा संपर्क, ६० हजार लोकसंख्या असतानाही वरणगावला मंजुरी नाही; महसूलमंत्र्यांकडे पुन्हा पाठपुरावा :

 

वरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात जामनेर, चाळीसगाव आणि जळगाव येथे नवीन अप्पर तहसील कार्यालयांना राज्य शासनाने मंजुरी दिली असताना, वरणगावचा मात्र या यादीत समावेश न झाल्याने शहरात नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे ६० हजार लोकसंख्या आणि परिसरातील २८ गावांचा संपर्क असलेल्या वरणगावला अप्पर तहसील कार्यालयापासून वंचित का ठेवण्यात आले, असा सवाल लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी उपस्थित केला आहे.

ब्रिटिश काळात तालुक्याचे ठिकाण राहिलेल्या वरणगावची भौगोलिक आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाची ओळख आहे. शहरासह परिसरातील २८ गावांतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी सोयीचे ठिकाण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.

या मागणीसाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत महसूलमंत्र्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना वरणगावच्या प्रस्तावासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आदेश दिले होते.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विहित नमुन्यात प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांमार्फत राज्याचे अपर मुख्य सचिव विकास खरगे यांच्याकडे पाठविला होता. भुसावळ तालुक्यातील मोठे शहर आणि परिसरातील गावांची प्रशासकीय गरज लक्षात घेता वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे आवश्यक असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. महसूलमंत्र्यांनीही यापूर्वी यासंदर्भात आदेश काढले होते, अशी माहिती नगराध्यक्ष काळे यांनी दिली.

मात्र, नव्याने अप्पर तहसील कार्यालयांना मंजुरी देताना जामनेर, जळगाव आणि चाळीसगाव या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले; परंतु वरणगावचा समावेश न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. एवढा पाठपुरावा करूनही वरणगावला मंजुरी का मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

“वरणगावला वारंवार का डावलले जात आहे?”

शहराची लोकसंख्या, परिसरातील २८ गावांची गरज आणि प्रशासकीय सोयीचा विचार करता वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. असे असतानाही वरणगावचा समावेश न होणे ही खेदाची बाब आहे. एवढा पाठपुरावा करूनही वरणगाववर अन्याय का, असा सवाल नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केला.

दरम्यान, नगराध्यक्ष काळे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून वरणगावच्या जनतेला न्याय देण्याची मागणी केली. देवा भाऊंचे सरकार हे जनतेचे सरकार असून, शहर आणि परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

शासनाच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष

वरणगावला अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्यास शहरासह परिसरातील २८ गावांमधील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे वरणगावच्या या मागणीवर शासन सकारात्मक निर्णय घेणार का, तसेच यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावाचे पुढे काय होणार, याकडे वरणगावसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.