भुसावळ (प्रतिनिधी) : जुन्या रेल्वे परिसरातील व्यवसायाच्या वादातून राहुलनगर परिसरात एका तरुणावर कथित गावठी पिस्तुलातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना ६ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमसिंग उर्फ गोलू रायसिंग पंडित (वय ३०, रा. राहुलनगर, बालाजी मंदिर परिसर, भुसावळ) हे त्यांच्या घराजवळील वैभव ट्रेडर्स दुकानाच्या ओट्यावर बसलेले असताना दगडी पुलाच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला. अनिकेत उर्फ कालू मनोज जाधव याने कथित पिस्तुलातून फिर्यादीच्या दिशेने दोन राऊंड गोळीबार केल्याचा आरोप असून, त्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शोध पथक आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून पाहणी केली तसेच फॉरेन्सिक पुरावे संकलित केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू करण्यात आला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. या प्रकरणी ७ जुलै रोजी धरमसिंग उर्फ गोलू रायसिंग पंडित यांच्या फिर्यादीवरून अमोल विनोद देवरे आणि अनिकेत उर्फ कालू मनोज जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या रेल्वे परिसरातील व्यवसायाच्या वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल तायडे करीत आहेत.


