नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते नाशिक विभागीय योगासन स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन. भुसावळ (प्रतिनिधी )-विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगसाधना अत्यंत महत्त्वाची असून, योगामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच मनाची एकाग्रता, मानसिक सामर्थ्य आणि आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास व सरावाच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आणि ताप्ती स्कूल भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक विभागीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. तर मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन ताप्ती स्कूलच्या प्राचार्या नीना कटलर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक व चेअरमन महेश फालक उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या योगासन राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी,मुकेश मोरे,विलास पाटील,लक्ष्मीकांत नेमाडे,सुनील चौधरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना नामदार संजय सावकारे म्हणाले की, भारत हा योगविद्येचा उगमस्थान असलेला देश असून प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी योगसाधनेच्या माध्यमातून शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांती आणि आत्मिक सामर्थ्य विकसित केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिले असून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून भारतीय योगपरंपरेला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच योग आणि क्रीडा क्षेत्राकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे असे त्यांनी मार्गदर्शन केले. मुलींच्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्या नीना कटलर यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, योग हा केवळ खेळ नसून तो शरीरशुद्धी, आरोग्य संवर्धन आणि मानसिक संतुलन राखण्याचा प्रभावी मार्ग आहे. नियमित योगाभ्यासामुळे एकाग्रता वाढते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा. चार प्रकारांत रंगली योगासन स्पर्धा या विभागीय स्पर्धेत नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यांसह महानगर क्षेत्रांतील खेळाडूंच्या संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा पुढील चार प्रकारांत घेण्यात आली. १. आर्टिस्टिक सोलो २. ट्रेडिशनल सोलो ३. आर्टिस्टिक पेअर ४. रिदमिक पेअर या स्पर्धेसाठी पंच म्हणून FOP-1, FOP-2 व FOP-3 या गटांमध्ये शाहिदखान पठाण,सागर चौधरी,कुंदन मगर, धनश्री देवरा,उबेद शेख,चैतन्य वाघ,राहुल चौधरी, आशुतोष भोई,सचिन जोहरे व तुषार जोहरे यांनी जबाबदारी पार पाडली. आयोजनासाठी क्रीडा पदाधिकाऱ्यांचे विशेष परिश्रम स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी योगासन राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी,डॉ.प्रदीप साखरे,विजय संकेत, लक्ष्मीकांत नेमाडे,सुनील चौधरी,गणेश बोदडे,गणेश टिंटोरे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील पदाधिकारी,क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे नाशिक विभागातील योगासन खेळाडूंना आपले कौशल्य,शारीरिक क्षमता व कलात्मकता सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूंची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असून, या स्पर्धेमुळे विभागातील योगासन क्रीडा चळवळीला निश्चितच नवी ऊर्जा आणि चालना मिळणार आहे. फोटो कॅप्शन - नाशिक विभागीय योगा मुलींचा संघासोबत प्रिसिपल निना कटलर सोबत डावीकडून विजय संकत,चंचल माळी,डॉ.प्रदिप साखरे,लक्ष्मीकांत नेमाडे,सुनिल चौधरी आदी.



