भुसावळात घरासमोर बसलेल्या व्यक्तीवर गोळीबार; दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोर फरार, परिसरात खळबळ

     भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी गोळीबाराची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ६) रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास राहुलनगर परिसरातील दगडी पुलाजवळील हनुमान मंदिरासमोर घडली. घरासमोर ओट्यावर बसलेल्या एका व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी कथितरीत्या गावठी कट्ट्यातून गोळीबार करून पलायन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती घरासमोर बसलेली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला चढविला. हल्लेखोरांनी कथितरीत्या गोळीबार करून क्षणार्धात घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेमुळे राहुलनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शोध पथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. फॉरेन्सिक पुरावे संकलित करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांनी किती गोळ्या झाडल्या, त्या लक्ष्यावर लागल्या की नाहीत, तसेच संबंधित व्यक्तीला कितपत दुखापत झाली आहे, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या घटनेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

घटनेनंतर राहुलनगर व परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. अधिकृत तपासानंतरच घटनेचा संपूर्ण उलगडा होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.