भुसावळ शहरातील वाढत्या पाणीटंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा ‘धिक्कार हंडा मोर्चा’

भुसावळ (प्रतिनिधी ) -: शहरात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येविरोधात सोमवार ६ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार "धिक्कार हंडा मोर्चा" काढण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

भुसावळ शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली धिक्कार हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी रिकामे हंडे आणि माठ हातात घेऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच शहरवासीयांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीबा पाटील, माजी नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते सचिन चौधरी, उल्हास पगारे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

यावेळी उपस्थित वक्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत, भुसावळ शहरातील पाणीप्रश्नाचे कायमस्वरूपी निराकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच, शहरातील प्रत्येक प्रभागात नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा सुनिश्चित करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.