भुसावळ (प्रतिनिधी ) - जागतिक सायकल दिन – २०२६ निमित्त भुसावळ विभागात तंदुरुस्ती, आरोग्य जागरूकता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी ‘संडे ऑन सायकल्स’ (SoC) या उपक्रमांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रेल्वे अधिकारी, कर्मचारी, खेळाडू आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मोठ्या उत्साहात या रॅलीत सहभाग नोंदविला. या रॅलीमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) श्री. पुनीत अग्रवाल, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री. प्रवीण कुमार पाठक, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री. एम. के. मीना, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त श्री. चितरेश जोशी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता श्री. रोहित कुमार राजपूत यांच्यासह विभागातील विविध अधिकारी, महिला व पुरुष खेळाडू, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच विविध विभागांतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीला वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त श्री. चितरेश जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपक्रम यशस्वी केला. या सायकल रॅलीच्या माध्यमातून नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सायकलचा अधिकाधिक वापर करून आरोग्य संवर्धनासोबतच प्रदूषणमुक्त व शाश्वत पर्यावरण निर्मितीसाठी योगदान देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. भुसावळ विभागाकडून रेल्वे कर्मचारी आणि नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली तसेच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


