एफडीएची मोठी कारवाई! परराज्यातून विक्रीसाठी येणारा 22 लाखांचा अवैध गुटखा ; पिकअप व्हॅनसह चालक अटकेत


जळगाव : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई करत सुमारे 21 लाख 81 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत गुटख्याने भरलेली पिकअप व्हॅन ताब्यात घेण्यात आली असून संबंधित चालकाला अटक करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील अन्न सुरक्षा विभागाला मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. अन्न सुरक्षा अधिकारी आरा खालकर यांना वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळाल्यानंतर विशेष पथक तयार करून संशयित वाहनावर नजर ठेवण्यात आली.

मुक्ताईनगरमार्गे जळगावकडे येणाऱ्या पिकअप व्हॅनचा क्रमांक प्रशासनाकडे आधीच उपलब्ध होता. वाहन जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वीच त्याचा मागोवा घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी सलग दोन दिवस पुरनाड तपासणी नाक्यावर तैनात होते. संशयित वाहन नाक्यावरून पुढे गेल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यात आला आणि याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.

रिलायन्स पेट्रोल पंपासमोर सापळा

जळगाव येथील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांच्या पथकाने रिलायन्स पेट्रोल पंपासमोर सापळा रचून एमएच-19-सीएक्स-3280 क्रमांकाची पिकअप व्हॅन अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विमल गुटख्याच्या 58 गोण्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची बाजारभावानुसार किंमत 21 लाख 81 हजार 600 रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

जप्त करण्यात आलेला गुटखा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये विक्रीसाठी आणला जात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अवैध साखळीमागील मुख्य सूत्रधार, मालाचा पुरवठादार आणि वितरण जाळ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस व अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त तपास सुरू केला आहे. जप्त मालासह वाहन ताब्यात घेण्यात आले असून चालकाची सखोल चौकशी सुरू आहे.

शाळा-महाविद्यालय परिसरातही विक्री

गुटखा विक्रीवर बंदी असतानाही शाळा, महाविद्यालये तसेच बस व रेल्वे स्थानकांच्या परिसरात त्याची राजरोसपणे विक्री होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली असून अन्न व औषध प्रशासनाच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.