प्रवाश्यांना मोठा दिलासा; दिवाळी आणि भाऊबीजसाठी भुसावळ–देवळाली दरम्यान विशेष मेमू रेल्वेगाडी :१० व ११ नोव्हेंबरला चार फेऱ्यांचे संचालन;

भुसावळ (प्रतिनिधी) – दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने भुसावळ ते देवळालीदरम्यान विशेष अनारक्षित मेमू रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १० आणि ११ नोव्हेंबर २०२६ रोजी या विशेष रेल्वेगाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार असून, यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१२२६ ही विशेष अनारक्षित मेमू रेल्वे भुसावळ स्थानकावरून १० व ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १.०५ वाजता देवळाली येथे पोहोचेल.

तर गाडी क्रमांक ०१२२५ ही विशेष अनारक्षित मेमू रेल्वे देवळाली येथून १० व ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता सुटून सायंकाळी ५ वाजता भुसावळ येथे पोहोचेल.

या विशेष रेल्वेगाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, नाशिक रोड आणि देवळाली या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला एकूण १२ मेमू कोच असणार आहेत.

विशेष गाडीच्या सर्व थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस (NTES) ॲपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

दिवाळी आणि भाऊबीज सणाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या विशेष मेमू सेवेमुळे भुसावळ, जळगाव, नाशिकसह मार्गावरील विविध स्थानकांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून, नियमित गाड्यांवरील अतिरिक्त गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वेसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.