भुसावळ (प्रतिनिधी/ उज्वला बागुल): दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह, प्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारा सण. सणाचा आनंद समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा आणि गरजूंच्याही चेहऱ्यावर हास्य फुलावे, या सामाजिक भावनेतून राजस्थानी विप्र समाज व जैन समाजाच्या वतीने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही साकेगाव जवळील वांजोळा रोड परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच गरजू नागरिकांना दिवाळीनिमित्त फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. राजस्थानी विप्र समाज संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा, जैन समाजातील जे बी कोटेचा, तसेच भावसार समाजाचे ज्येष्ठ नागरिक अरुण भावसार यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाईचे वाटप केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले. यानंतर पाटील मळा येथील मणियार हॉल परिसरातील गरीब मुस्लिम भगिनींनाही दिवाळी फराळाचे वाटप करून सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विविध जाती-धर्मांतील नागरिकांना एकत्रितपणे आनंदात सहभागी करून घेत सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या प्रसंगी कार्तिक शर्मा, सिद्धेश शर्मा, सुनील ठाकूर , सुरेश अग्रवाल, विजू सावदेकर , जयंतीलाल सुराणा, गौतम चोरडिया, अतुल ताथेड यांच्यासह विविध जाती-धर्मांतील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत सणांचा आनंद गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा आनंद यातून मिळाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. . दिवाळीचा खरा आनंद हा एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यात आणि माणुसकीचे नाते जपण्यातच असतो असेही विनोद शर्मा यावेळी म्हणाले. अ


