भुसावळ विभागीय रेल्वे रुग्णालयात अग्निसुरक्षा जनजागृती सेमिनार संपन्न ;

 भुसावळ (प्रतिनिधी) - भुसावळ विभागीय रेल्वे रुग्णालयात संरक्षा विभागाच्या वतीने अग्निसुरक्षा विषयक जनजागृती सेमिनाराचे आयोजन करण्यात आले. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद व बचाव कार्याबाबत आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे हा या सेमिनाराचा मुख्य उद्देश होता.

या सेमिनारला मुख्य वैद्यकीय अधीक्षक (CMS), वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णालयातील वैद्यकीय व परिचारिका (नर्सिंग) कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आग लागण्याची संभाव्य कारणे, त्यापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना, अग्निशमन उपकरणांचा योग्य वापर तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण व कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

सेमिनारमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अग्निसुरक्षेसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आत्मसात केली. अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम रुग्णालयातील सुरक्षा संस्कृती अधिक बळकट करण्यास तसेच आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भुसावळ विभागाच्या वतीने भविष्यातही अशा जनजागृती उपक्रमांचे आयोजन करून सुरक्षित व सजग कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.