NEET-UG 2026 परीक्षा रद्द; पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या परीक्षेनंतर पेपरफुटी आणि गैरप्रकारांचे आरोप समोर आल्यानंतर केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) कडे तपास सोपवण्यात आला आहे.

राजस्थानसह अनेक राज्यांत पेपरफुटीचे आरोप

राजस्थानसह काही राज्यांमध्ये परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. काही ठिकाणी कथित ‘गेस पेपर’मधील प्रश्न आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न जुळत असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावरही पेपरफुटीच्या चर्चेला मोठे उधाण आले होते.

या पार्श्वभूमीवर NTA ने ८ मे रोजी केंद्रीय यंत्रणांकडे प्राथमिक पडताळणीसाठी हे प्रकरण सुपूर्द केले होते.

पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

तपास यंत्रणांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनंतर परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता धोक्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानंतर भारत सरकारच्या मंजुरीने NTA ने ३ मे रोजी झालेली NEET-UG 2026 परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली.

तसेच ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी यावर नाराजी व्यक्त करत परीक्षा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी कठोर पाऊल

NTA ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच कठोर निर्णय घेत परीक्षा रद्द करण्यात आली. तपासादरम्यान सर्व नोंदी, दस्तऐवज आणि आवश्यक माहिती CBI ला उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले आहे.