सुनसगाव ता. भुसावळ, (वार्ताहर ) – भुसावळ–वांजोळा–गोजोरा–सुनसगाव मार्गे बेलव्हाळपर्यंत धावणारी एसटी सेवा शाळांना सुट्टी लागल्यापासून बंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात असून ही सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भुसावळ येथून नियमितपणे सुरू असलेली ही एसटी सेवा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची वाहतूक व्यवस्था मानली जाते. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांच्या सुट्टीनंतर बस सेवा बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक व कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शासनाने महिलांसाठी अर्ध तिकीट तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना लागू केली असली तरी बस सेवा बंद असल्याने या योजनांचा लाभ घेता येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बेलव्हाळ व सुनसगाव येथील ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांकडे एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
दरम्यान, बेलव्हाळ व सुनसगावच्या सरपंचांनी एसटी महामंडळाकडे सेवा सुरू करण्याबाबत निवेदन दिले असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी गोजोरा व वराडसिम येथील पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे भुसावळ–वराडसिम एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती. त्याच धर्तीवर भुसावळ–सुनसगाव–बेलव्हाळ एसटी सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी सुनसगाव, बेलव्हाळ, गोजोरा आणि वांजोळा येथील नागरिकांनी केली आहे.


