भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील नारायण नगर परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षीय तारकेश विशाल झोपे या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २४ एप्रिल रोजी सकाळी शाळेत जात असताना नारायण नगर परिसरात एका कुत्र्याने तारकेशवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर व नाकावर गंभीर जखमा झाल्या होत्या. जखमांची तीव्रता इतकी होती की त्याच्या चेहऱ्यावर तब्बल ८० टाके घालावे लागले.
घटनेनंतर तारकेशवर जळगाव येथील शिल्पा हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीराज महाजन यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचार व प्लास्टिक सर्जरीसाठी त्याला मुंबई येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे झोपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव
भुसावळातील भिरूड कॉलनी, नारायण नगर, रिंग रोड, म्हाडा कॉलनी, चितोळे मंगल कार्यालय परिसर, गणेश कॉलनी आदी भागांत मोकाट कुत्र्यांची दहशत वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध तसेच दुचाकीस्वारांना यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग आणि दुर्लक्षित परिसरांमुळे कुत्र्यांना पोषक वातावरण मिळत असून त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पाळीव कुत्र्यावर हल्ल्याचा आरोप
दरम्यान, हा हल्ला नारायण नगरातील रहिवासी प्रकाश कोळी उर्फ खन्ना यांच्या पाळीव कुत्र्याने केल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
तसेच, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणाऱ्या महिलांना प्रकाश कोळी यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला असून हा प्रकार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डमाळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.
नगरपरिषदेची कारवाई; ५ कुत्री जप्त
घटनेनंतर नगरपरिषद कर्मचारी दीपक बारसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकाश कोळी यांच्या घरातून पाच कुत्री पकडून जप्त केली. या कारवाईवेळी परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
यावेळी नागरिकांनी आक्रमक व धोकादायक मोकाट कुत्र्यांना तातडीने पकडण्यात यावे ,
नियमित श्वान नसबंदी मोहीम राबवावी , शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात या प्रमुख मागणीसह अनेक मागण्या केल्या आहेत.
या दुर्दैवी घटनेनंतर भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.


