जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील एमआयडीसी परिसरात आज दुपारी भीषण आग लागून मोठी खळबळ उडाली. ‘जे’ सेक्टरमधील चटई तयार करणाऱ्या एका कंपनीत अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. कंपनीत साठवलेल्या ज्वालाग्राही साहित्यामुळे आगीचा वेग प्रचंड वाढला आणि संपूर्ण परिसर धुराच्या ढगांनी व्यापला गेला.

या घटनेत कंपनीतील तब्बल चार गॅस सिलिंडरचे एकामागून एक स्फोट झाले. या स्फोटांच्या भीषण आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटांमुळे आगीची तीव्रता आणखी वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, आगीची झळ शेजारील ठिबक सिंचन साहित्य तयार करणाऱ्या कंपनीपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. जीव धोक्यात घालून काही कामगारांनी कंपनीतील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीचा व्याप मोठा असल्याने सुरुवातीला उपलब्ध साधनसामग्री अपुरी पडत असल्याचे दिसून आले. गाड्यांतील पाणी संपल्यानंतर आग पुन्हा भडकत असल्याने अतिरिक्त अग्निशमन दलाची मदत मागविण्यात आली आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अधिकृत तपासानंतरच याबाबत स्पष्ट माहिती मिळणार आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.



