भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने तिकीटविना व अनधिकृत प्रवासाविरुद्ध एप्रिल २०२६ मध्ये उल्लेखनीय कारवाई करत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. या कालावधीत एकूण १ लाख ९ हजार प्रकरणांमधून तब्बल ₹१२.२३ कोटी दंड वसूल करण्यात आला आहे.

प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने संपूर्ण नेटवर्कवर तिकीट तपासणी मोहिमा अधिक व्यापक आणि सघन केल्या आहेत. भुसावळ विभागात मेल-एक्सप्रेस, प्रवासी आणि विशेष गाड्यांमध्ये नियमितपणे तपासणी राबवून तिकीटविना प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवले जात आहे.
ही मोहीम विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या दिशादर्शनात आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) पी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.
एप्रिल २०२६ मधील कामगिरीने विभागाने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. यापूर्वी मे २०२५ मध्ये ₹११.२० कोटी इतका सर्वोच्च मासिक महसूल नोंदवला गेला होता. आता नवीन विक्रम ₹१२.२३ कोटींचा झाला आहे.
एप्रिल महिन्यातील कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- अनियमित प्रवासाची ४४,७३८ प्रकरणे; ₹२.१८ कोटी दंड
- विनातिकीट प्रवासाची ६३,६०८ प्रकरणे; ₹६.७० कोटी दंड
- बुक न केलेल्या सामानाच्या ४०४ प्रकरणांतून ₹५० हजार दंड
तिकीट तपासणी मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी, नियोजनबद्ध तपासणी आणि प्रवाशांमध्ये नियमांविषयी जनजागृती यामुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले.
मध्य रेल्वे भुसावळ विभागाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊन जबाबदारीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. विनातिकीट प्रवासाबाबत शून्य-सहिष्णुता धोरण कायम ठेवत, प्रवाशांना सन्मानजनक व त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.


