भुसावळात गावठी कट्ट्यांसह तरुण अटकेत; पोलिसांचा सापळा यशस्वी

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या एका तरुणाला गावठी शस्त्रांसह भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. भूषण शांताराम कोळी (वय 19, रा. पाडळसा, ता. यावल) असे अटकेतील संशयीत आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले (कट्टे) व एक धारदार गुप्ती जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आलिशान वॉटर पार्कच्या मागील मोकळ्या जागेत एका तरुणाकडे शस्त्र असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार डीबी पथकाने शुक्रवारी रात्री सुमारे 8.20 वाजता सापळा रचला. संशयिताने पोलिसांना पाहताच पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

अंगझडतीदरम्यान आरोपीकडून सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे, एक हजार रुपये किंमतीची गुप्ती तसेच 20 हजार रुपये किंमतीचा आयफोन असा ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल भूषण चौधरी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान संशयीत आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास हवालदार कांतीलाल केदारे करीत आहेत.