भुसावळ विभागात ‘पोषण पखवाडा’ निमित्त विविध आरोग्य उपक्रम

भुसावळ(प्रतिनिधी) — मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ९ ते २३ एप्रिल २०२६ दरम्यान ‘पोषण पखवाडा’ उत्साहात साजरा केला जात असून, या निमित्ताने विविध आरोग्य व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत १३ एप्रिल रोजी विभागीय रेल्वे रुग्णालय, भुसावळ येथे “महिला व बालकांसाठी योग” या विषयावर विशेष सत्र पार पडले. फिजिओथेरपिस्ट डॉ. खदीजा यांनी सुरक्षित व्यायामाचे महत्त्व तसेच दैनंदिन जीवनात फिजिओथेरपीची गरज याबाबत मार्गदर्शन केले. या सत्राचा १६८ जणांनी लाभ घेतला.

त्यानंतर १५ एप्रिल रोजी मध्य रेल्वे महिला कल्याण संगठन संस्कृती प्राथमिक शाळेत जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मी यांनी ‘पोषण पखवाडा’चे महत्त्व स्पष्ट करत संतुलित आहार, योग्य पोषण आणि चांगल्या सवयींची गरज अधोरेखित केली. श्रीमती ज्योती पाल यांनी बालकांच्या आरोग्य व पोषण विषयावर संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात २५७ जणांनी सहभाग घेतला.

१६ एप्रिल रोजी याच शाळेत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. मोहम्मद तालीब यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्या आरोग्य स्थितीचे मूल्यांकन केले. या शिबिरात २१ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

या सर्व उपक्रमांमुळे ‘पोषण पखवाडा’ अंतर्गत पोषण, निरोगी जीवनशैली आणि योग याबाबत प्रभावी जनजागृती झाली असून, नागरिकांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले आहे.