पोलिस सेवेसोबत समाजजागृतीची गाणी; संदीप बडगे यांच्या गायनाचा कार्यक्रम

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरीत स्टार लॉन येथे पोलिस दलात कार्यरत असलेले गायक संदीप बडगे यांच्या गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आपल्या कर्तव्याबरोबरच समाजजागृतीची जबाबदारी उचलत बडगे यांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे, पंचायत समितीचे सभापती राजेंद्रभाऊ चौधरी, पोलिस निरीक्षक गायकवाड , डॉ. राजेश मानवतकर, बसपाचे ज्येष्ठ पदाधिकारी रवींद्रजी गवई, प्रागतिक चळवळीचे रवींद्र चौधरी, युवा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, जे.पी. सपकाळे सर, सोनूभाऊ नेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांनी सांगितले की, समाजप्रबोधनाची गाणी ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती सामाजिक परिवर्तनाला दिशा देणारी असतात. समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश अशा गीतांमधून प्रभावीपणे पोहोचतो.
जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटींचा समृद्ध इतिहास लाभलेला आहे. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन अनेक कलाकारांनी समाजजागृतीचे कार्य पुढे नेले आहे. त्याच परंपरेत संदीप बडगे यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम सामाजिक भान जागृत करणारा ठरला असून उपस्थितांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.