जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; प्रशासनाकडून कडक उपाययोजना

जळगाव (प्रतिनिधी ) राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश विभागात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने गंभीर इशारा दिला असून जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सर्व विभागांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. सलग काही दिवस उष्णतेची लाट राहिल्यास जीवितहानी होण्याचा धोका असल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला आहे.

वाढत्या तापमानामुळे मजुरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी भरदिवसा कडाक्याच्या उन्हात कामावर ठेवू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. कामगारांना जबरदस्तीने कामाला लावणाऱ्या आस्थापनांवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

याशिवाय शाळा, महाविद्यालये आणि मनरेगा कामांच्या वेळांमध्ये बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी शहरातील उद्याने दिवसभर खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये पुरेसा पाणीसाठा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.