.जळगाव,(प्रतिनिधी ) दि. १५ एप्रिल २०२६ – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत लाभ देताना लाच मागितल्याच्या प्रकरणात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत महिला कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले. आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, बांधकाम कामगार कल्याण मंडळातील कर्मचाऱ्याविरुद्ध लाचखोरीत अटक होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराने ९ एप्रिल २०२६ रोजी मंडळाच्या योजनेअंतर्गत गृह उपयोगी संच मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर १५ एप्रिल रोजी चिंचोली (ता. जि. जळगाव) येथील वाटप केंद्रावर संच घेण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले. केंद्रावर गेल्यानंतर तक्रारदाराला प्रथम एका कर्मचाऱ्याकडे पाठवण्यात आले आणि त्यानंतर आरोपी आसमा शेख यांच्याकडे नेण्यात आले.
यावेळी आरोपीने “संच ताब्यात देण्यासाठी केवायसी करावी लागेल आणि त्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील” अशी मागणी करत तक्रारदाराकडे लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत तत्काळ एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सायंकाळी सापळा रचत पंचांसमक्ष आरोपीला १०० रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
कारवाईदरम्यान आरोपीच्या टेबलाखाली ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीतून ५००, २००, १०० व ५० रुपयांच्या नोटांमध्ये एकूण ४१,२५० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात ही रक्कम लाभार्थ्यांकडून केवायसीच्या नावाखाली लाच म्हणून गोळा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ७ अन्वये एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्कॉलरशिपमध्येही कमिशन घेत असल्याची तक्रार
ज्या बांधकाम कामगारांची मुले उच्च शिक्षण घेत आहे त्यांना उच्च शिक्षणासाठी मिळत असलेल्या शिष्यवृत्तीसाठी 30 ते 35 टक्के कमिशन घेऊन त्यांचे स्कॉलरशिपचे अनुदानाचे अर्ज मंजूर केले जात असल्याचे जळगाव मध्ये बोलले जात आहे. त्यामुळे या र दलालांच्या रॅकेटचा पर्दाफाश होणे जरुरीचे आहे.
कारवाईतील अधिकारी व पथक :
या सापळा कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे (एसीबी नंदुरबार) यांनी काम पाहिले. पथकात उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोहेकॉ बाळू मराठे, पो.कॉ. राकेश दुसने व प्रदीप पोल यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नकशे करत आहेत.
एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी कोणीही लाच मागितल्यास त्वरित तक्रार करावी. यासाठी टोल-फ्री १०६४, दूरध्वनी ०२५७-२२३५४७७, तसेच dyspacbjalgaon@gmail.com / spacbNashik@mahapolice.gov.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.
या कारवाईमुळे बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांमधील भ्रष्टाचारावर आळा बसण्यास मदत होणार असून, लाभार्थ्यांना लाचमुक्त सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



