भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील म्युनिसिपल पार्क परिसरात असलेल्या सेंट्रल सर्कीट सिने असोसिएशनच्या कार्यालयावर काही व्यक्तींनी बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती. गंगोबाई कालू गवळी, जाफर कालू गवळी, सईद कालू गवळी आणि अफझल कालू गवळी यांनी कथितपणे खोटी कागदपत्रे व बलप्रयोगाच्या माध्यमातून कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता.

ही असोसिएशन १९५२ पासून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील चित्रपट प्रदर्शक व वितरकांची एक जुनी आणि भक्कम संघटना म्हणून ओळखली जाते. सुमारे ८२५ सभासद असलेल्या या संस्थेमार्फत चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे टॉकीज व वितरक कर्मचाऱ्यांना वैद्यकीय व शैक्षणिक मदतही केली जाते.
संस्थेचे कार्यालय म्युनिसिपल पार्क, भुसावळ सि.स. नं. ३८७३/३२ (म्यु. घर नं. ३६५९, नवा ७/४१४) येथे असून, ते ४ डिसेंबर १९९२ रोजी जमशेदजी अर्देशर अमरोलीवाला व इतरांकडून नोंदणीकृत खरेदीखताद्वारे विकत घेण्यात आले आहे.
१९ मे २०२४ रोजी बलपूर्वक ताबा घेण्याचा प्रयत्न झाला होता. यापूर्वी ७ मे २०२४ रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, तर २० मे २०२४ रोजी फिर्याद नोंदवण्यात आली. या प्रकरणात काही आरोपींना अटकही करण्यात आली होती.
या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी भारतीय दंड प्रक्रिया संहिता कलम १४५ अंतर्गत प्रकरण उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे वर्ग केले. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयाकडून दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी, जळगाव यांनी कार्यवाही करून संबंधित जागेचा ताबा पुन्हा असोसिएशनकडे सुपूर्द केला.
या संपूर्ण प्रक्रियेत प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे असोसिएशनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. सुमारे ७२ वर्षांपासून चित्रपटसृष्टीला सेवा देणाऱ्या या संस्थेला अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.


