भुसावळ (प्रतिनिधी) – प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी भुसावल रेल्वे विभागाने विनातिकीट व अनधिकृत प्रवासाविरोधात कारवाई अधिक तीव्र केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर 8 एप्रिल 2026 रोजी “फोर्ट्रेस तिकीट तपासणी अभियान” राबविण्यात आले.

या विशेष मोहिमेत भुसावल, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या आठ प्रमुख स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. अभियानाचा मुख्य उद्देश प्रवाशांना वैध तिकीटासह प्रवास करण्यास प्रवृत्त करणे आणि अनधिकृत प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवणे हा होता.
अभियानात 60 तिकीट तपासणी कर्मचारी तसेच 9 रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. तपासणीदरम्यान एकूण 601 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून ₹4,30,330 इतका दंड वसूल करण्यात आला.
याशिवाय, रेल्वे कायद्याच्या कलम 145B व 167 अंतर्गत 17 प्रकरणे नोंदवून ₹2,500 दंड आकारण्यात आला. स्थानक परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या 12 विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरोधात नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
भुसावल विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, गैरसोय व दंड टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा. तिकीट खरेदीसाठी अधिकृत विक्रेते, रेल्वे स्थानकांवरील बुकिंग खिडक्या, एटीव्हीएम तसेच IRCTCच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच प्रवाशांनी आपल्या मोबाईलवर Rail One अॅप डाउनलोड करूनही तिकीट बुकिंगची सुविधा वापरू शकतात.


