मला जनतेचा आशिर्वाद जनतेनेच मला निवडून दिले यापुढे मी विरोधास न जुमानता शहर विकास करणारच – गायत्री भंगाळे. भुसावळमध्ये विकास कामांवरून राजकीय वातावरण तापले: विकास मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप :

भुसावळ(प्रतिनिधी ) – मला जनतेचा आशिर्वाद जनतेनेच मला निवडून दिले यापुढे मी विरोधास न जुमानता शहर विकास करणारच असे ठाम मत नगराध्यक्षा सौ गायत्री भंगाळे यांनी मांडले. विरोधकांनी सत्ता असताना नऊ वर्षात काय केले असा संतप्त प्रतीसवाल उपस्थितही केला.

शहरातील विकासकामांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले असून, यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी ९ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, भाजपच्या काही नगरसेवकांकडून नगरपालिकेच्या बैठकीत मुद्दाम अडथळे निर्माण केले जात आहेत. माईक हिसकावणे, निर्णय प्रक्रियेत अडथळा आणणे अशा प्रकारांमुळे कामकाज सुरळीत होऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

“मी सामान्य कुटुंबातील महिला असल्यामुळे जाणीवपूर्वक वारंवार त्रास दिला जात आहे,” असा आरोपही त्यांनी करीत यापुढे त्रास झाल्यास त्वरीत गुन्हे दाखल करणार असल्याचा इशाराही यावेळी दिला. . तसेच, विकासकामांसाठी विविध मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असून, जनतेच्या पाठिंब्याने विकासकार्य पुढे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे सूचित केले.

यावेळी नगरसेवक सचिन चौधरी यांनीही भाजपवर टीका करत, “भुसावळचा खरा विकास संतोष चौधरी यांच्या कार्यकाळात झाला,” असे सांगितले. पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरसेवक उल्हास पगारे यांनी आरोप केला की, भाजपच्या नगरसेवकांकडून विकासकामांना मुद्दाम अडथळे आणले जात आहेत, जे शहराच्या हिताच्या विरोधात आहे.

कामगार नेते जगन सोनवणे यांनी सांगितले की, अमृत योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र विरोधकांकडून अडथळे निर्माण केले जात आहेत. आमदार निधी नगरपालिकेकडे वर्ग केल्यास विकासकामांना गती मिळेल, असे त्यांनी सुचवले.

या पत्रकार परिषदेला नगरसेवक अनुप खोब्रागडे, मुकेश गुंजाळ, जयंत लोणारी, माजी नगरसेवक रवि सपकाळे, दुर्गेश ठाकूर, विशाल नारखेडे, साजिद पठाण, कुरेशी आदी उपस्थित होते.

दरम्यान, भुसावळमध्ये सुरू असलेल्या या राजकीय वादामुळे विकासकामे रखडण्याची भीती व्यक्त होत असून, नागरिकांनी हा संघर्ष थांबवून विकासाला प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.