छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील स्लॅबचे प्लास्टर कोसळले, मोठी दुर्घटना टळली

भुसावळ (प्रतिनिधी ) -: शहरातील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. मंगळवारी (दि. ७) सकाळच्या सुमारास संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे प्लास्टर अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने त्या वेळी परिसरात दुकानदार किंवा ग्राहक नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

घटनेनंतर प्लास्टरचे तुकडे खाली पडून बराच वेळ ढिगारा तसाच पडून होता. मात्र, पालिकेकडून तत्काळ कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील महत्त्वाचे मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल सध्या पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून, एकेकाळचे शहराचे वैभव असलेले हे संकुल आता धोकादायक बनले आहे. गेल्या सुमारे २५ वर्षांत या इमारतीची एकदाही रंगरंगोटी किंवा आवश्यक देखभाल-दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, संकुलाची मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे.

दरम्यान, या संकुलाची मुदतही संपलेली असताना पालिकेकडून ना दुरुस्ती केली जात आहे, ना दुकानदारांना मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

संकुलातील छतावरील प्लास्टर सतत कोसळत असल्याने भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे तातडीने इमारतीची दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.