भुसावळ (प्रतिनिधी) -: शहरातील डायमंड पार्क परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवार, 7 एप्रिल रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख इस्ताक शेख मोहम्मद (वय 40) हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. 31 मार्च रोजी सायंकाळी ते वरणगाव येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. 1 एप्रिल रोजी दुपारी घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. तसेच घरातील हॉल व बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.
तपासणीदरम्यान बेडरूममधील लोखंडी कपाट आणि त्यातील तीन लॉकर उघडलेले दिसून आले. कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. यामध्ये सहा ग्रॅम वजनाची अंदाजे 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, 20 भार वजनाचे सुमारे 10 हजार रुपये किंमतीचे चांदीचे पायातील कडे आणि 1 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 10 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
ही घरफोडी 31 मार्च सायंकाळी 5 ते 1 एप्रिल दुपारी 4 या कालावधीत घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश देशमुख करत आहेत.


