भुसावळ विभागातील मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १४ एप्रिलपासून अंमलबजावणी

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वेने भुसावळ विभागातील निवडक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला असून, हे बदल एप्रिल महिन्यात टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सर्वात महत्त्वाचा बदल ट्रेन क्रमांक 12111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–अमरावती एक्सप्रेसमध्ये करण्यात आला असून, १४ एप्रिल २०२६ पासून ही गाडी भुसावळ विभागातील विविध स्थानकांवर नव्या वेळेनुसार धावेल. नाशिकरोड येथे आगमन ००:१५ व प्रस्थान ००:२०, जळगाव ०३:१३/०३:१५, भुसावळ ०३:४०/०३:४५, मलकापूर ०४:३८/०४:४०, नांदुरा ०४:५८/०५:००, शेगाव ०५:१८/०५:२०, अकोला ०६:१०/०६:१५, मूर्तिजापूर ०६:४८/०६:५०, बडनेरा ०७:५७/०८:०० आणि अमरावती येथे ०८:३५ वाजता आगमन होईल.

तसेच 12289 सीएसएमटी–नागपूर दुरांतो एक्सप्रेसची सुटण्याची वेळ बदलून रात्री २०:३५ करण्यात आली आहे (पूर्वी १९:५५). भुसावळ येथे ही गाडी ०२:४५/०२:५० आणि बडनेरा येथे ०५:४८/०५:५० वाजता थांबेल. परतीच्या 12290 नागपूर–सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेसचे बडनेरा येथे २२:१०/२२:१२ आणि भुसावळ येथे ००:५०/००:५५ असे वेळापत्रक राहील.

याशिवाय, 12809 सीएसएमटी–हावडा मेल, 12844 अहमदाबाद–पुरी एक्सप्रेस, 22973 गांधीधाम–पुरी एक्सप्रेस आणि 20862 अहमदाबाद–पुरी एक्सप्रेस या गाड्यांच्या बडनेरा स्थानकावरील वेळांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 12105 सीएसएमटी–गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, 19022 बहरामपूर–उधना अमृत भारत एक्सप्रेस, 22140 अजनी–पुणे साप्ताहिक एक्सप्रेस आणि 22124 अजनी–पुणे वातानुकूलित साप्ताहिक एक्सप्रेस यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत.

हे सर्व बदल १४ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान विविध तारखांना लागू होणार असून, विशेषतः बडनेरा, भुसावळ आणि इतर महत्त्वाच्या स्थानकांवरील वेळांमध्ये बदल झाल्याने प्रवाशांनी अद्ययावत वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वेळेतील हे बदल गाड्यांची वेळेवर धावण्याची क्षमता सुधारण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी करण्यात आले आहेत.