भुसावळ येथे मेजर रॉबर्ट गिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामूहिक प्रार्थना सभेचे आयोजन:

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक छायाचित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामूहिक प्रार्थना सभेचे आयोजन सेंट पॉल चर्च, भुसावळ येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ९:३० वाजता वेळेवर सुरू होणार असून कला शिक्षक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉ. सतीश कुलकर्णी (सेवानिवृत्त प्राचार्य, सेंट्रल रेल्वे स्कूल, भुसावळ) यांनी शब्दबद्ध केलेल्या “अजिंठ्याची गाथा चुकवेल काळजाचा ठोका” या मेजर रॉबर्ट गिल यांच्या जीवनावर आधारित भावनिक गीताचे QR कोडद्वारे विमोचन होणार आहे.

तसेच खान्देशातील प्रसिद्ध शाहिर विनोद ढगे यांच्या पहाडी आवाजात पोवाड्याचे सादरीकरण होणार असून, सेंट्रल रेल्वे स्कूलच्या संगीत शिक्षिका सौ. स्मिता कुलकर्णी यांच्याकडून मेजर रॉबर्ट गिल यांच्यावर आधारित गीत सादर करण्यात येणार आहे.

यावेळी अजिंठा विषयावरील चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार असून, जळगाव येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक श्री. राजू बाविस्कर यांना त्यांच्या “काळ्या निळ्या रेषा” या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम AVF आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन, भुसावळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, राजेंद्र जावळे (सेवानिवृत्त कला शिक्षक, सेंट्रल रेल्वे स्कूल, भुसावळ) यांनी सर्व कला प्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.