भडगावात शेतकऱ्यांचा संताप उसळला; टोकनसाठी रांगा, पोलिसांचा लाठीचार्ज

भडगाव ( प्रतिनिधी)
डिजिटल युगात देश झपाट्याने पुढे जात असताना भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र आपले धान्य विकण्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शेतकी संघाच्या ढिसाळ नियोजनामुळे ज्वारी खरेदीसाठी टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल २४ तास रांगेत उभे राहावे लागले. या गोंधळात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. ६ एप्रिल) रात्रीपासूनच तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी टोकन मिळवण्यासाठी शेतकी संघाच्या कार्यालयासमोर जमा होऊ लागले. मंगळवार दुपारपर्यंत शेकडो शेतकरी कडक उन्हात रांगेत उभे होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आली नव्हती. पिण्याचे पाणी, सावली किंवा बसण्याची सोय नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि परिसरात गोंधळ निर्माण झाला.

गर्दी वाढत चालल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र परिस्थिती अधिकच चिघळल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

“वर्षभर कष्ट करून पीक पिकवायचं आणि ते विकण्यासाठी अशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आता तर धान्य विकताना पोलिसांचा मारही सहन करावा लागत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या घटनेमुळे शेतकी संघाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची टीका होत आहे. तसेच लाठीचार्ज करणारे पीएसआय सोनवणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही शेतकरी करत आहेत.

प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य नियोजन व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.