शोकाकुल वातावरणात दोघींच्या पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार :

भुसावळ (प्रतिनिधी) – ट्युशनला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मैत्रिणींना विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील साकरी येथे मंगळवार, 27 रोजी घडली. या हृदयद्रावक घटनेत दोन्ही विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात दोघींच्या पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

साकरी येथील 15 वर्षीय दोन विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी शिकवणीसाठी घरातून निघाल्या होत्या. त्यावेळी गावातीलच एका अल्पवयीन मुलाने त्यांना मोटारसायकलवर बसवून गावालगत असलेल्या अविनाश फेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ नेले. तेथे आरोपीने दोन्ही मैत्रिणींना विहिरीत ढकलल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनींची दप्तरसुद्धा संशयिताजवळच आढळून आली आहेत.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी दोन्ही विद्यार्थिनींचे मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह साकरी येथे आणण्यात आले. सकाळी 10 वाजता स्मशानभूमीत दोन्ही मैत्रिणींवर एकाच वेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.