भुसावळात मॉर्निंग वाक दरम्यान महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार पसार! दोन अज्ञात चोरट्यांकडून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास; झटापटीत महिला किरकोळ जखमी

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील देना नगर परिसरात मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) सकाळी मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेला थांबवून चोरट्यांनी हा प्रकार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देना नगर येथील रहिवासी अनिता दिलीप खंडेलवाल (वय ५७) या नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. मॉर्निंग वॉक आटोपून त्या आपल्या घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडवले. यावेळी त्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी संवाद साधला. मात्र, काही समजण्याच्या आतच या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनिता खंडेलवाल घाबरल्या. मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटनेत त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच जखमी महिलेची भेट घेऊन दुचाकीवरून आलेल्या दोन्ही अज्ञात व्यक्तींचे वर्णन, त्यांचा पेहराव आणि दुचाकीबाबत माहिती जाणून घेतली.
दरम्यान, सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याने देना नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असून, मंगळसूत्र हिसकावून पळून गेलेल्या दोन्ही अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.