शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून जळगावातील सेवानिवृत्ताची १.३५ कोटींची ऑनलाइन फसवणूक ; सायबर पोलिस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल :

जळगाव (प्रतिनिधी) – शेअर ट्रेडिंगमधून अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या जळगावातील एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिवारी नगर परिसरात वास्तव्यास असलेले आणि खासगी कंपनीतून निवृत्त झालेले ६१ वर्षीय व्यक्ती यांनी ३१ ऑगस्ट रोजी इंटरनेटवर शेअर ट्रेडिंगविषयी माहिती शोधली. यावेळी दिसलेल्या एका व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना एका शेअर ट्रेडिंग ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात आले. या ग्रुपमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत माहिती देत अधिक नफ्याचे आमिष दाखवण्यात आले.

ग्रुपमधून पाठविण्यात आलेल्या लिंकवरून गुंतवणूक केल्यानंतर मोठा नफा होत असल्याचे बनावट आकडे दाखवण्यात आले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी संबंधित व्यक्तीकडून ५० हजार रुपये ऑनलाइन घेण्यात आले. त्यानंतर अधिक नफा मिळत असल्याचे सांगत त्यांच्याकडून ७८ लाख ३५ हजार रुपये शेअर खरेदीच्या नावाखाली उकळण्यात आले.

टॅक्सच्या नावाखाली आणखी रक्कम उकळली

यानंतर त्यांच्या खात्यावर ४ कोटी ४२ लाख ९८ हजार ३३८ रुपये जमा झाल्याचे दाखवण्यात आले. ही रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच समोरील व्यक्तींनी १० टक्के सर्व्हिस टॅक्स भरण्याची मागणी केली. त्यानंतर पुन्हा १५ टक्के कॅपिटल गेन टॅक्स भरण्यास सांगण्यात आले.

या आमिषाला बळी पडून सेवानिवृत्त व्यक्तीने २६ नोव्हेंबर रोजी ५ लाख रुपये तसेच ३० नोव्हेंबर रोजी ८ लाख २२ हजार ३७५ रुपये ऑनलाइन पाठविले. मात्र, इतकी मोठी रक्कम भरूनही त्यांच्या खात्यातून एकही रुपया मिळाला नाही.

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.