आमदार अमोल जावळेंच्या अचानक पाहणीत भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी गैरहजर; जिल्हा अधीक्षकांकडून कारणे दाखवा नोटीस!नागरिकांच्या तक्रारींची घेतली गंभीर दखल;

रावेर (प्रतिनिधी) : खिरोदा मंडळाच्या सिटी सर्व्हे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने आमदार अमोल जावळे यांनी कार्यालयाला अचानक भेट देत पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित अधिकारी कर्तव्यावर असतानाही कार्यालयात गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची आमदार जावळे यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जळगाव यांनी संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

खिरोदा मंडळाच्या सिटी सर्व्हे कार्यालयातील अधिकारी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांची विविध कामे रखडत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच कामासंदर्भात विचारणा केली असता नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचेही नागरिकांनी आमदार अमोल जावळे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या तक्रारींची दखल घेत आमदार जावळे यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन पाहणी केली.

यावेळी संबंधित परिरक्षण भूमापक श्री. शशिकांत रमेशचंद्र ठाकरे हे कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आले. ठाकरे हे खिरोदा प्र. यावल येथे परिरक्षण भूमापक म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या शासकीय कामकाजाच्या अनुषंगाने कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र, ते मागील दोन ते तीन दिवसांपासून कार्यालयात हजर नसल्याची बाबही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

या प्रकारानंतर आमदार अमोल जावळे यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित प्रकाराची तक्रार केली. त्यानुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जळगाव यांनी संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सदर नोटीसमध्ये संबंधित अधिकाऱ्याला तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार पुढील शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत होणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे आणि नागरिकांना योग्य सहकार्य करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी केलेल्या अचानक पाहणीमुळे भूमी अभिलेख विभागातील कामकाजाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता संबंधित अधिकाऱ्याच्या खुलाशाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.