समाजमाध्यमांवर आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बनावट नोटांचा मोठा साठा जप्त

मुक्ताईनगर प्रतिनिधी — समाजमाध्यमांवर “एक लाख रुपयांत दहा लाख रुपये मिळतील” असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून बनावट नोटांचा मोठा साठा तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या कुन्हा दुरक्षेत्र अंतर्गत मधापुरी, लालगोटा, हलखेडा, जोंधनखेडा, चारठाणा आदी गावांतील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी फेसबुक व इतर समाजमाध्यमांवर आर्थिक प्रलोभन देणारे व्हिडीओ प्रसारित केल्याचे उघडकीस आले. या व्हिडीओंमध्ये एक लाख रुपयांच्या मोबदल्यात दहा लाख रुपये, सोन्याच्या विटा, नाणी, काळी हळद, रेड मर्क्युरी, नागमणी आदी देण्याचे आमिष दाखवले जात होते.

या आमिषाला बळी पडलेल्या देशातील विविध भागांतील नागरिकांना संबंधित परिसरात बोलावून त्यांच्याकडून मारहाण करून रोख रक्कम व साहित्य लुटल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांनी विशेष आदेश दिले होते. त्यानुसार समाजमाध्यमांवरील संशयास्पद व्हिडीओंचा शोध घेण्यात येत होता.

दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी “Saawariya Set” या फेसबुक प्रोफाइलवरून २८ सेकंदांचा एक संशयास्पद व्हिडीओ प्रसारित झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या व्हिडीओमध्ये “एक लाख का दस लाख मिलेगा, जिसे खरीदना है वही कॉल कीजिए” असे आमिष दाखवण्यात आले होते. व्हिडीओमध्ये नमूद मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपास केला असता लालगोटा (ता. मुक्ताईनगर) येथी शिवकुमार शमी भोसले, देवकुमार शिवराज भोसले,
सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले
यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक ४२०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ६२, ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपींच्या ताब्यातून “CHILDREN BANK OF INDIA – पाचशे रुपये” असे लिहिलेल्या एकूण १०६५ बनावट कागदी नोटा तसेच ५ अँड्रॉईड मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी . सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, सहा. पोलीस निरीक्षक. राजेंद्र चाटे, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.