भुसावळ (प्रतिनिधी) – शिंदी परिसरात शेती पंपांसाठीचा वीजपुरवठा दिवसा सुरू व रात्री बंद राहत असल्याने विद्युत तार चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चोरी झाल्यानंतर वेळेवर नवीन तार टाकण्यात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी मौजे मोंढाळे शिवारातील सुरेश नरसिंग कोळी यांच्या शेतातील गट क्रमांक १९६/१/१ येथून एकूण पाच गाळ्यांची विद्युत तार चोरीस गेली. त्यानंतर २२ डिसेंबर २०२५ रोजी मौजे मोंढाळे येथीलच अर्जुन चिंधू लोहार यांच्या शेतातील गट क्रमांक ६८/२ मधून दोन गाळ्यांची विद्युत तार चोरी झाल्याची घटना उघडकीस आली.
या प्रकरणी शिंदी येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता यांनी भुसावळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली असून पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील महिन्यात मौजे विचवे गावातील भरत पंढरी भोळे यांच्या शेतातील विद्युत तार चोरीस गेल्याची घटना घडली होती. वारंवार होत असलेल्या या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांना पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नसल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
विद्युत तार चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला असून, अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


