जळगाव | विशेष प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपालिका व २ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल आज, रविवारी (दि. २१) जाहीर होत आहे. नगराध्यक्षपदासह ४६४ नगरसेवकांच्या जागांसाठी उभ्या असलेल्या १,५५४ उमेदवारांचे भवितव्य आज मतमोजणीत ठरणार असल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. सकाळी ७ वाजेपासून सर्व १८ ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार असून सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

यंदा अनेक ठिकाणी थेट व अटीतटीच्या लढती झाल्या. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष विशेष लक्षवेधी ठरला. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक पद्धत असल्याने ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे, तर प्रतिष्ठेचीही बनली. मुक्ताईनगर, पाचोरा, फैजपूर, नशिराबाद, भडगाव, वरणगाव आणि सावदा येथे सरळ दोन प्रमुख पक्षांमध्ये लढती रंगल्या. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून उमेदवार नसल्याने तेथे भाजप व शिंदे गट यांच्यातच स्पर्धा मर्यादित राहिली.
मतमोजणीची तयारी पूर्ण
भुसावळ येथे मतदारसंख्या अधिक असल्याने तब्बल १५ फेऱ्यांत मतमोजणी होणार असून निकाल उशिरा अपेक्षित आहे. शेंदुर्णी, रावेर आणि धरणगाव येथे मात्र केवळ दोन फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण होणार असल्याने या ठिकाणचे निकाल सर्वप्रथम जाहीर होतील. सर्व केंद्रांवर सुरक्षा व प्रशासकीय व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.
वादग्रस्त घटना चर्चेत
जामनेर, मुक्ताईनगर आणि चाळीसगाव येथे मतदानाच्या दिवशी बोगस मतदानाच्या आरोपांवरून वाद झाले होते. काही ठिकाणी पोलिस हस्तक्षेप करावा लागला. मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रात उमेदवारांच्या प्रवेशावरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलिस प्रशासनात शाब्दिक वाद झाल्याची घटना चर्चेत राहिली.
गाजलेल्या लढती
जामनेर: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध निवडून आल्याने नगराध्यक्षपद निश्चित.
पाचोरा: शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील समर्थित उमेदवार विरुद्ध भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ.
चाळीसगाव: भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाणo यांच्याविरुद्ध शहर विकास आघाडीच्या पद्मजा देशमुख.
भुसावळ: भाजपकडून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे विरुद्ध माजी आमदार संतोष चौधरी व एकनाथ खडसे
चोपडा: भाजप–काँग्रेस आघाडी, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात तिरंगी लढत.
मुक्ताईनगर: शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांना भाजपकडून थेट आव्हान; एकनाथ खडसे यांनी शरद पवार गटाचा उमेदवार न देता भाजपाला पाठिंबा दिला.
भडगाव: भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात तिरंगी चुरस.
आकडेवारी
जिल्ह्यात ९७७ मतदान केंद्रांवर ८,८१,५०८ मतदारांपैकी ५,९९,३१३ मतदारांनी मतदान केले. १,५९० टपाली मतपत्रिकांचाही समावेश आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे १५, शिवसेना (शिंदे गट) ८, अजित पवार गट ६, ठाकरे गट ४, शरद पवार गट २ आणि काँग्रेसचे २ उमेदवार रिंगणात होते.
आज दुपारपर्यंत जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर कोणाचा झेंडा फडकणार, हे स्पष्ट होणार आहे.


