भुसावळसह राज्यभरातील पालिकांमध्ये भाजपाचीच सत्ता येणार – मंत्री संजय सावकारे

भुसावळ (प्रतिनिधी l i

भुसावळसह वरणगावक0च नव्हे तर राज्यभरातील नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये भाजपाची निर्विवाद सत्ता येणार, असा ठाम विश्वास भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शनिवारी व्यक्त केला. शहरातील प्रभाग क्रमांक ११ ‘ब’ व ४ ‘ब’ या लांबणीवर पडलेल्या निवडणुकांसाठी मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उमेदवारांच्या अपिलांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या या दोन्ही प्रभागांच्या निवडणुका शनिवारी पार पडल्या. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बोलताना मंत्री सावकारे म्हणाले, “रविवारी निकाल जाहीर होणार असला तरी भुसावळमधील विजयाबाबत आम्हाला पूर्ण खात्री आहे. वरणगावसह राज्यात भाजपाची लाट असून कमळ निश्चित उमलेल.”

दरम्यान, जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ‘जळगाव प्रभारी’ व ‘जळगाव निवडणूक प्रमुख’ या पदांबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. “मी स्वतः नगरपालिका व नगरपंचायतींसाठी जिल्हा प्रभारी म्हणून काम केले आहे. नगरपंचायत निवडणुकांदरम्यान जळगावसाठी मंगेश चव्हाण तर रावेरसाठी नंदू महाजन हे निवडणूक प्रमुख होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद असल्याचा प्रश्नच येत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षहित लक्षात घेऊनच जबाबदाऱ्यांचे वाटप केले जाते, असे सांगत मंत्री सावकारे यांनी भाजप संघटनात्मकदृष्ट्या मजबूत असून आगामी निवडणुकांत पक्षाला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.